
जळगाव (प्रतिनिधी) – उधार घेतलेल्या पैशांच्या कारणावरुन सुनिल पहुमल आहुजा (रा. कंवरनगर सिंधी कॉलनी) यांना दोघांनी स्टिलच्या कड्याने मारहाण करीत जखमी केले. तसेच पोलिसात तक्रार केल्यास तुझे पाय कापून टाकील अशी धमकी दिली. ही घटना दि.२९ रोजी दुपारी फुल मार्केटमध्ये चौथ्या मजल्यावर घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील फुले मार्केटमध्ये कपड्यांच्या दुकानात सुनिल आहुजा हे कामाला आहे. दि. २९ रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या मुलाच्या ओळखीचा नितीन सोनवणे व अन्य इसम तेथे आला. त्यांनी आहुजा यांना दुकानातून बाहेर बोलावून तुमच्या मुलाने घेतलेले उधार पैसे परत द्या असे म्हणाला. त्यानंतर सर्व जण हे मार्केटच्या चौथ्या मजल्यावर गेले. दरम्यान, आहुजा यांनी माझ्या मुलाने उसनवार घेतलेले पैसे आम्ही दिले असून तुझे कुठलेही पैसे आता आमचेकडे बाकी नाही असे सांगितले. त्याचा राग आल्याने नितीन सोनवणे याने शिवीगाळ करीत हातातील स्टिलच्या कड्याने आहुजा यांच्या डोक्यावर वार करीत जखमी केले. तर सोनवणे याने तु जर पोलीस तक्रार केली तर तुझे पाय कापून टाकेल अशी धमकी देखील दिली.
उपचारानंतर दिली तक्रार
परिसरातील नागरिकांनी आहुजा यांची मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर आहुज यांनी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार नितीन सोनवणे (रा. समता नगर) याच्यासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















