
पॅरिस (प्रतिनिधी) – अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडातील अल्पवयीनांचा ऑनलाइन छळ करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या असलेल्या भारतीय तरुणाला फ्रान्सच्या पॅरिसमधील न्यायालयाने दोषी ठरवून २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. रोहन राणे नामक हा २९ वर्षीय युवक पुण्याचा रहिवासी असून, तो फ्रान्समध्ये उच्च शिक्षणासाठी गेला होता.
लहान मुलांना हिंसक आणि लैंगिक व्हिडीओ बनवण्यास भाग पाडल्याचा गंभीर कृत्यांचे आरोप या टोळीवर ठेवण्यात आला आहे. ही आंतरराष्ट्रीय टोळी ‘डिस्कॉर्ड’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून अल्पवयीन मुलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर या मुलांना सीव्हीएलटी’ नावाच्या कुप्रसिद्ध समूहाचे ‘गुलाम’ बनवून त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले जात होते. रोहन राणे या टोळीचा मुख्य सूत्रधार होता. तो फ्रान्समध्ये उच्च शिक्षण घेत असताना, अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे २०२१ मध्ये फ्रान्सच्या अँटीब शहरातून त्याला अटक करण्यात आली होती.
मुलांचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त
अमेरिकेतील पाच पीडित मुलांचे प्रतिनिधित्व करणारे वकील हिप्पोलिट मारकेटी यांनी कोर्टात सांगितले की, या गुन्हेगारी कृत्यांमुळे मुलांचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, त्यांना कधीही भरून न निघणारे गंभीर मानसिक आघात पोहोचले आहेत. न्यायालयाने राणेला अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण आणि त्यांना छळल्याप्रकरणी दोषी धरत कायद्यातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त म्हणजे २० वर्षांची शिक्षा सुनावली. हा खटला अत्यंत संवेदनशील आणि मुलांच्या शोषणाशी संबंधित असल्याने न्यायाधीशांनी संपूर्ण सुनावणी बंद खोलीत घेण्याचा निर्णय घेतला होता.
















